वाई – लाडक्या बहिणीचे नाव घेऊन महिला संरक्षणापासून दूर पळणाऱ्या,शेतकरी,कामकरी, विद्यार्थी आणि तळागाळातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात सद्याच्या सरकारची मानसिकता नाही.हे सरकार सर्वांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे विधानसभेचा कारभार महाविकास आघाडीच्या हाती येणार असून मतदारसंघाच्या विकासासाठी अरुणादेवी पिसाळ यांचा हात उंचावत त्यांना विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाई येथील सभेत केले.
वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारार्थ वाई येथे सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी स्टार प्रचारक किरण माने,सुनिल माने,रामदास कांबळे,विराज शिंदे,नंदकुमार घाडगे, डॉ.नितिन सावंत,यशराज भोसले,ॲड.इम्तियाज खान आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान,शरद पवार यांनी आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात राज्यातील प्रश्न, महायुती सरकारचे अपयश याविषयी जास्त भाष्य केले.
यावेळी पवार म्हणाले,मकरंद पाटील यांच्यामुळेच आजच्या सभेचा योग आल्याचे सांगून जर त्यांचे वडील लक्ष्मणराव पाटील असते,तर आजची ही वेळ आली नसती,असे सांगत त्यांना मी भरभरून दिले आहे.परंतु हल्ली त्यांची वृत्ती कुठे काही दिसले की मला द्या असे मागण्याची झाली असल्याचे दिसून येते असे सांगितले. साखर कारखान्याची आणि मतदारसंघाच्या विकासाचे कारण सांगून त्यांनी माझ्यापासून दुरावा घेतला. राज्यातील अनेक साखर कारखान्यांमध्ये आर्थिक अडचणी आहेत. त्यांच्या कारखान्यामध्ये अशी कोणती मोठी अडचण होती,असे सांगून मला तर मतदार संघात मोठा विकास झालेला दिसत नाही.
मतांसाठी लाडक्या बहिणीची आठवण करणाऱ्या राज्य सरकारला महिला संरक्षणाची काळजी नाही. राज्यात यांच्या काळात६७ हजार ३८१ महिलांवर मुलींवर अत्याचार झाले. ६४ हजार महिला व मुली बेपत्ता झाल्या. त्यामुळे राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत गांभीर नाही.यांना लाडक्या बहिणींची नाही तर सत्तेची चिंता आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याने त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे. महिला सन्मानाचे राज्याचे आजपर्यंत शेकडो वर्षाचे सूत्र असताना,या सरकारने महिलांच्या संरक्षणाबाबत काहीही केलेले नाही.शेतकरी आत्महत्या राज्यात वाढल्या आहेत.शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नाही. त्यामुळे यांनी १२६७ शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केले.या सरकारची तळागाळातल्या लोकांचे, सर्वसामान्यांचे, शेतकरी, कामकरी, विद्यार्थ्यांचे, तळागाळातल्या लोकांचे प्रश्न सोडविण्यात कोणतीही मानसिकता नाही.राज्यात दडपशाही आणि दहशतीचे वातावरण आहे. या अन्यायाला कंटाळल्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील जनता विधानसभेचा कारभार सत्ता महाविकास आघाडीकडे देणार आहे असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.
अरुणादेवी पिसाळ यांनी राज्यातील दुर्गम भागाचे जीवन आजही दुर्लक्षित मतदार संघातील पाणी प्रश्न, रस्ते विकास, भूमिपुत्रांना नोकरीची संधी मिळत नाही.वीस वर्षांपूर्वी गेलेली आमदारकी परत मिळवण्यासाठी, तालुक्याचा खुंटलेला विकास पुन्हा सुरू करण्यासाठी मला विजयी करावे असे आवाहन केले.
चौकट
सभा संपल्यानंतर शरद पवार जात असताना त्यांना एक चिठ्ठी देण्यात आली. चिठ्ठी वाचल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा सभेच्या जागेवर येऊन,पुन्हा माईक हातात घेऊन चिट्टी वाचून दाखवली.तुम्ही अरुणादेवी पिसाळ यांना निवडून देण्याचे आवाहन केले.परंतु ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांचे काय करायचे? त्यावर पवारांनी जर त्यांनी गद्दारी केली असेल तर त्यांना पाडा असे सांगितले.