खंडाळा- मतदान जनजागृती अभियान अंतर्गत तालुक्यात मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा सादर करण्यात आला.तर पथनाट्यामधून सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा,असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा ,सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला जावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.यासाठी मानवी साखळीचे नियोजन करण्यात आले होते.खंडाळयातील राजेंद्र विद्यालय, ज्ञानसंवर्धिनी प्रशाला शिरवळ येथील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.या उपक्रमांतर्गत खंडाळा,शिरवळ,लोणंद शहरांसह ग्रामीण भागातील शाळांचे विद्यार्थी,शिक्षक,पालक मतदान जागृती रॅलीत सहभागी होत आहेत.
दरम्यान,तालुक्यातील जनतेमध्ये मतदान जागृती व्हावी,या उद्देशाने ठिकठिकाणी शासकीय कर्मचारी मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करीत आहेत ,खंडाळा,शिरवळ येथील कॉलेजमध्ये मानवी साखळी तयार करत भारताचा नकाशा सादर करण्यात आला होता.याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अजित पाटील,गटविकास अधिकारी अनिल वाघमारे,सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले,नोडल अधिकारी स्वीप गजानन आडे, प्रकल्प अधिकारी छाया मुगदूम,शिक्षण विस्तार अधिकारी रमेश यादव,नवनाथ भरगुडे,केंद्रप्रमुख सुनिता साबळे,विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते