खंडाळा- हरिनामाचा जयघोष अन् टाळ मृदंगाचा गजरात खंडाळ्यातील राजेंद्र विद्यालयाचा दिंडी सोहळा मार्गस्थ झाला.यावेळी प्रमुख मार्गावरून पायी दिंडी मार्गक्रमण करीत असताना शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे राजेंद्र विद्यालयाकडून आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात विठ्ठल रखुमाईसारखा पेहराव आणि पारंपारिक पद्धतीचा वारकऱ्यांचा पोशाख परिधान करुन विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्रारंभी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेची पूजा डि.जी.गाढवे, सोमनाथ गर्जे,अश्विनी निकम यांच्यासह मान्यवराच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर दिंडी सोहळा राजेंद्र विद्यालयापासून सुरु झाला.माऊलींचा पालखी सोहळा वाटचाल करीत असताना महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या रेखाटल्या होत्या.यावेळी नागरिकांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करीत माऊलींच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. टाळ मृदुंगाचा गजर आणि माऊलींच्या नामाचा जय घोष करत ग्रामदैवत भैरवनाथ देवाचे दर्शन घेऊन सोहळा पंचायत समितीच्या प्रांगणात दाखल झाला.अभंग आळवीत विद्यार्थीनींनी फुगड्या खेळत दिंडीमध्ये आनंद लुटला.
यावेळी प्राचार्य शब्बीर नालबंद, उपप्राचार्य अरुंधती गाढवे,पर्यवेक्षक सुशिला मोहिते,तुळशीराम खांडे, व्हि.एन.गाढवे,एस.जी.ठाकरे,अश्विनी निकम,तबस्सुम पठाण, उज्वला गाढवे, योगिता गाढवे,रेणुका पवार, यशवंत गुरव आदी शिक्षक, कर्मचारी आदींनी सहभाग नोंदवत सोहळा यशस्वी पार पडला.