खंडाळा- कुस्ती हा एक सहासी खेळ असून सर्व पालकांनी आपल्या मुलांना या खेळा विषयी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन खंडाळ्याचे तहसिलदार अजित पाटील यांनी बोलताना केले.
खंडाळा येथील राजेंद्र उच्चमाध्यमिक विद्यालय व प.पु.बापूजी साळुंखे विद्यालय असवली यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा पारगाव खंडाळा मयुरमंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन ताराळकर,खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके,उत्तमराव ढमाळ,सुमित पाटील,प्राचार्य शब्बीर नालबंद, मुख्याध्यापक दत्तात्रय गुरव,निवेदक बाबाजी लिमण आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान,विभागीय स्पर्धेचे औचित्य साधत खंडाळा विभाग शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव अनिरुद्ध गाढवे,उपप्राचार्य अरुंधती गाढवे यांनी खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळ ही खेळले पाहिजे. खेळामध्ये सहभाग घेत आवड जोपासने गरजेचे असून 21 व्या शतकात मुलगा मुलगी असमान नाहीत. मुलीं ही कुस्ती क्षेत्राकडे वळून आपल्या बरोबर शाळेचा, गावाचा नावलौकीक वाढवावा असे मत प्राचार्य शब्बीर नालबंद यांनी व्यक्त केले.
यावेळी शिक्षक, खेळाडू उपस्थित होते.