खंडाळा – आधार आधारित संचमान्यता तसेच कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती देण्याचा निर्णय रद्द करावा,यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत काळी फीत लावून विरोध प्रदर्शन करण्यासह येत्या बुधवारी (दि. २५) किरकोळ सामूहिक रजा घेत साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
साताऱ्यातील गांधीमैदान येथून दुपारी एक वाजता मोर्चाला प्रारंभ होणार आहे. राजपथ,पोलीस करमणूक केंद्र मार्गे,खालच्या रस्त्याने पोवई नाक्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा पोहचेल असे सांगण्यात आले.
दि. १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड संबंधित वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे. २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व डीएड,बीएड पात्रताधारकांना नियुक्तीचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय रद्द करावा. सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या आणि २००४ नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीधारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा.दि. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांना, शासकीय कर्मचाऱ्यांना १९८२ चा पेन्शन आदेश निर्गमित करावा आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.तसेच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश तत्काळ मिळावेत.जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी.ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत. तेथे तातडीने द्यावीत.पाठ्यपुस्तकांना कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पस्तिका द्याव्यात अशा मागण्यांचा समावेश आहे.