खंडाळा – शहरामध्ये मोकाट श्वानांची वाढती संख्या आणि त्यांचा होणार उपद्रव यावर योग्य त्या उपाय योजना करू असे आश्वासन खंडाळ्याच्या नगराध्यक्षा उज्वलाताई संकपाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले.
खंडाळा शहरामध्ये श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.लहान मुले, शाळकरी विद्यार्थी,काही जेष्ठ नागरिकांना चावा घेण्याच्या घटना घडल्या आहेत.तर कधी इतरत्र भटकणारे श्वान दुचाकीचा पाठलाग करतात.त्यामुळे अपघात होवून जखमी होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.त्यामुळे या समस्येमुळे नागरिक हैराण झाले असून शहरवासीयांनी मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यात यावा,अशा मागणीचे निवेदन नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आले.
दरम्यान,शहरातील रस्त्यावर भटक्या श्वानांची संख्या हि शंभराच्या घरात असल्याची चर्चा आहे.त्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहरवासीयांमध्ये भितीचे वातावरण असल्याचे दिसून येते.त्याचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे. श्वानांचा बंदोबस्त करण्याबाबत ठराव हि घेण्यात आला आहे.त्यावर ढिम्म प्रशासनाकडून काय उपाय योजना करण्यात आल्या असा सवाल उपस्थित होत आहे.