पाण्यासाठी खंडाळ्यात धरणे आंदोलन
खंडाळा –
धोम-बलकवडी कालव्यामधून पाणी न सोडल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करित तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरूवात केली आहे.
पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे धोम-बलकवडीतून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील विविध गावच्या शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. खंडाळ्याचे तहसिलदार अजित पाटील यांना काही दिवसापूर्वी निवेदन दिले होते.त्यावर संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक पार पडली.त्यामध्ये संबधित अधिकाऱ्यांना दोन दिवसांमध्ये खंडाळा तालुक्यासाठी आवर्तन सोडावे असे तोंडी आदेश दिले होते,असे सांगण्यात आले.
दरम्यान,खंडाळा तालुक्याला पाणी सोडण्यात यावे.या मागणीसाठी तहसिल कार्यालयावर शेतकरी दाखल झाले.यावेळी घोषणाबाजी करीत प्रशासकीय इमारतीच्या मुख्य दरवाजात शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला.
यापूर्वीही पाणी टंचाईबाबत खंडाळा, बावडा, पळशी,केसुर्डी,हरळी,नायगाव,अहिरे, म्हावशी, धावडवाडी, घाडदरे,बोरी,सुखेड,खेड बु॥,पाडळी, निंबोळी,कोपर्डे या गावातील शेतकरी यांनी निवेदन देऊन व्यथा मांडल्या होत्या. वारंवार मागणी करूनही प्रशासन दूर्लक्ष करित असल्याची चर्चा आहे.तर धोम- बलकवडीच्या कालव्यातुन जोपर्यत पाणी सोडले जाणार नाही.तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.